तीच्या वाढदिवसाला 4 महिने होते पण माझा बचत करण्याचा इतिहास पाहता हाही वेळ अपुरा होता तिच्यासाठी काही चांगलं अथवा मोठं गिफ्ट घेण्यासाठी. शिक्षणासाठी शहरात राहत असल्यामुळे घरून पैसे मिळायचे पण ते सुद्धा फक्त महिन्याच्या राहण्या व जेवणापुरते, कधी 100 व 200 रुपये वाचले तरी असं वाटायचं जसं ह्या महिन्याला जॅकपॉट लागलाय. अशा परिस्थीतीत हे गिफ्ट घेणं मोठं कठीण काम होतं.
त्यावर इलाज म्हणून मी निर्णय घेतला की ह्या चार महिन्यात एकही पैसा स्वतःवर खर्च करायचा नाही, ऑडिओ कॅसेट नाही, नवीन पुस्तक नाही, कँटीन चे सामोसे नाही की विनाकारण चहा नाही, तिच्या प्रेमाची ओढ ह्या सगळ्या गोष्टींवर वरचढ होती. ज्या महिन्यात जितके पैसे वाचले त्यात काहीतरी विशेष पण आपल्या भावना व्यक्त करनारी वस्तू घेत राहिलो. असं करता करता बऱ्यापैकी गिफ्ट्स जमा केली आणि तो दिवस आता फक्त 15 दिवसांवर येऊन ठेपला.
ती माझ्यापासून जवळपास 150 किमी दूर दुसऱ्या गावी राहायची त्यामुळे संपर्काचे साधन म्हणजे STD/PCO समोर उभं राहायचं, एकतर आपण फोन करायचा किंवा तिच्या फोनची वाट बघायची, कधी कुणाद्वारे जमलं तर चोरटं पत्र. पण हे सगळं सोपं नव्हतं, एक एक फोन करणं वा पत्र पोहचवनं म्हणजे मोठी कसरत, तिच्या घरच्यांना माहिती पडू नये म्हणून सगळं अगदी गनिमिकाव्याने गुपचूप करावं लागायचं. पण त्यातही एक मजा होती, तिचा तो गोड आवाज ऐकल्यावर, ती 2-3 मिनिटाच्या फोनकॉल साठी केलेली सारी धडपड सार्थी लागायची आणि मन म्हणायचं कि हा कॉल कधी बंदच होऊ नये. त्यावेळी STD कॉल्स खूप महाग असायचे आणि 10 सेकंदाची एक पल्स असायची, त्या 10 सेकंदाचे 1.7 रुपये पडायचे (अंदाजे). त्यामुळे खूप बचत करून हा समारंभ आठवड्यातुन एक वा दोनदा पार पडायचा, दोघांकडेही स्वतःचे लँडलाईन फोन नसल्यामुळे याच्या त्याच्या द्वारे संदेश मिळायचे. पत्र सुद्धा घरच्या पत्त्यावर पाठवू शकत नव्हतो, त्यामुळे त्या गावाला जाणाऱ्या एखाद्या भरवशाच्या माणसाला हि कामगीरी द्यावी लागे. पत्र इच्छीत स्थळी पोहोचेपर्यंत बाजीप्रभूसारखं खिंड लढवल्यासारखं वाटायचं, एक चूक आणि हा संपर्क मार्ग सुद्धा बंद. तिच्याशिवाय जगायचं कसं ? हा विचारसुद्धा करवत नसे.
अशा परिस्थीतीत मी ठरवलं की येत्या वाढदिवसाला आपणच तिच्या गावाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी जाऊन सर्व भेटवस्तू तिला परस्पर द्याव्यात. जाण्या येण्यासाठी आणखी पैशांची गरज होती पण मुख्य प्रश्न ह्याहूनही मोठा होता, तिला सांगायचं कसं कि आपण तिच्या गावाला येतोय कारण वर सांगितलेले सगळे प्रॉब्लेम्स आणि त्यादरम्यान परिस्थिती अजून बिकट होती. तिच्या घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता.
समग्र विचार केल्यावर एक कल्पना सुचली कि तिच्या मैत्रिणीच्या घरी जायचं आणि सर्व वस्तू तिच्या जवळ देऊन परत निघून यायचं, त्या मार्गावर बसेस ची ये जा कमी असल्यामुळे मला पाठोपाठ दुसरी बस घेऊन परत यावं लागणार होतं, मिळणारा वेळ होता 30 मिनीटं, जाण्यायेण्यात लागणार होते 15 मिनिटं. तिच्याशी बोलतांना एकदा तिने हे सांगितलं होतं की ती प्रत्येक वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची. तिला भेटण्याच्या व समोरासमोर बोलायला मिळणाऱ्या त्या 15 मिनिटांच्या आशेवर मी माझा 4 तासांचा प्रवास सुरु केला, वेळेचा अंदाज बांधून व देवाचे नाव घेऊन बस निवडली. पैसे जास्त नसल्यामुळे स्वतःवर संयम ठेवत पूर्ण रस्ताभर नुसतं फुकट मिळणाऱ्या पाण्यावर वेळ काढला. कसाबसा तिच्या गावात पोहचलो आणि तिच्या मैत्रिणीच्या घराकडे अक्षरशः पळत सुटलो कारण ती जर का तिथे असेल तर मला जास्त वेळ मिळेल तिच्याशी बोलायला.
धापा टाकत तिच्या मैत्रिणीच्या दारात पोहचलो व पहिला प्रश्न केला “ती आहे का इथे?”, उत्तर नकारार्थी होतं, नियतीचा खेळ. स्वतः वर संयम राखून मी उभ्या उभ्याच पानी प्यायलो, तिची मैत्रिण काहीतरी सांगत बसली पण माझं लक्ष तिकडे नव्हतं. 15 मिनिटं वाट बघत राहिलो दाराकडे बघत, प्रत्येक क्षणाला वाटायचं पुढच्या क्षणी ती तिथे दिसेल म्हणून, पण माझं नशीब ठाम अडून बसलं होतं आणि मधेच कुठेतरी ती सुद्धा.
तीची मैत्रीण वारंवार म्हणत होती “थांब, ती येईलच इतक्यात” पण वेळ आपल्या गतीने संपत चालली होती. शेवटी स्वतःची हार पत्करत मंद पावलांनी परत बस स्टॉपकडे निघालो. उनाड पोरागत मन गांव सोडायला तयार होत नव्हतं पण शिस्तप्रिय आईसारखं डोकं त्याला जबरीनेच बस स्टॉपकडे ढकलत होतं. बस उभीच होती, शेवटचा पुकारा होईपर्यंत बाहेर उभं राहून मी आपल्या मनातली आशा जागवत राहीलो, बस चालक सुद्धा कधी नाही तो आज अगदी वेळेवर आपल्या जागेवर होता. पूर्णवेळ माझं ध्यान त्या मार्गावरच होतं, परत तीच अपेक्षा – दिसेल ती पुढच्या क्षणी. तो रस्ता धूसर होत गेला, बसने गाव सोडलं आणि मी माझ्या अश्रूंचा बांध.
नियतीपुढे आपण किती क्षुल्लक असतो हे त्या दिवशी कळलं. पूर्ण रस्ता तिच्या आठवणींच्या उजळणीत गेला आणि त्याच अवस्थेत मी माझ्या रूम वर आलो. तसाच कित्येक तास पडून राहिलो रात्र होईपर्यंत. माझ्या नेहमीच्या STD PCO वाल्याने माझी तंद्री मोडली, म्हणाला “तुझा फोन आलाय”, मी तसाच निघालो बूथ कडे. फोन उचलला आणि फक्त हॅलो बोलू शकलो, ह्या वेळी दोघेही सोबतच रडत राहिलो, आज बिलची चिंता मला थांबवू शकली नाही.
खूप वेळानंतर सावरल्यावर कळलं की फक्त पाचच मिनिटांनी तिची माझी चुकामुक झाली होती.
आजही त्या पाच मिनिटांच्या विचारात मी कित्येक तास वाया घालवतो, अजूनही तिथेच, त्या बस स्टॉपवर, तिची वाट पाहत उभा – अधांतरी
You need to login in order to vote
Leave A Comment